आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग ६
ऋग्वेदकाल- (क्रमश:)
इ.स 1893 मधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकाचे नाव होते 'ओरायन'(Orion). आपण मराठीत ज्याला मृगनक्षत्र म्हणतो त्या तारकासमुहाचे हे युरोपियन नाव आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती सतत फिरत राहून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वीच्या या दोन गतींमुळे निर्माण झालेल्या व सर्वसामान्यांना ज्ञात असलेल्या कक्षेशिवाय, आणखी एका कक्षेमधे, पृथीचा उत्तर धृव सतत फिरत असतो. पृथ्वीच्या या अतिरिक्त गतीला, परांचन गती (Precession) असे नाव आहे. या परांचन गतीमुळे आपल्याला आकाशात जे दृष्य परिणाम दिसतात त्यांचा आधार घेऊन, काही जुन्या आर्य ग्रंथांचा काल ठरवण्याचा, लोकमान्यांनी 'ओरायन' या पुस्तकात प्रयत्न केला आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक, आजमितीला सुद्धा कालार्पण(Obsolete) झालेले नाही.
परांचन गती(पुस्तक संदर्भ 1)
स्वत:भोवती फिरणारी पृथ्वी, सूर्याभोवती वर्षभरात एक प्रदक्षिणा करते. या प्रदक्षिणेमुळे, आपल्याला एका वर्षभरात, सूर्य आकाशातील तारकांमधून प्रवास करताना दिसतो. सूर्याच्या या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्ताची पातळी ही विषुव वृत्ताच्या पातळीशी 23.5 अंश एवढी कललेली आहे. वर्षभराच्या या परिभ्रमणात फक्त दोन बिंदूंशी ही दोन्ही वृत्ते एकमेकाला छेदतात. या बिंदूंना संपातबिंदू (Equinoxes) म्हणतात. यापैकी 21 मार्च ला होणार्या संपाताला, वसंत संपात (Spring Equinox) असे म्हणतात तर 23 सप्टेंबरला होणार्या संपाताला, शरद संपात (Autumn Equinox)म्हणतात. या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्र हे समान कालावधीचे म्हणजे 12 तासाचे असतात.
मुलांच्या खेळण्यातला भोवरा आपण सर्वांनी बघितलेला आहे. हा भोवरा फिरत असताना त्याच्या माथ्याकडे जर लक्ष दिले तर असे लक्षात येते की हा माथा त्या भोवर्याच्या उर्ध्व-अधर अक्षाभोवती (Vertcal Axis) अगदी अल्प गतीने प्रदक्षिणा घालत असतो. स्वत:भोवती एखाद्या भोवर्याप्रमाणे फिरणार्या पृथ्वीचा उत्तर धृव, याच पद्धतीने पृथ्वीच्या मध्यातून जाणार्या व आयनिक वृत्ताला काटकोनात असणार्या एका अक्षाभोवती प्रदक्षिणा घालत रहातो. या एका प्रदक्षिणेचा काल 26000 वर्षे एवढा असतो. उत्तर धृवाच्या या गतीलाच परांचन गती असे नाव आहे.
या परांचन गतीमुळे पृथ्वीच्या उत्तर धृवाच्या ख-स्वस्तिक बिंदूजवळ दिसणारा तारा, कायम रहात नाही. आज या ठिकाणी धृव तारा दिसत असला तरी 5000 वर्षांपूर्वी या ठिकाणी ठुबान हा तारा दिसत असे तर इ.स. 14000 मधे अभिजित हा तारा धृवतारा म्हणून दिसेल. परांचन गतीमुळे आणखी एक विलक्षण दृष्य परिणाम दिसतो. दोन्ही संपात बिंदू, नक्षत्रांच्या संदर्भात, मागे मागे जाताना दिसतात. (सूर्य निरनिराळ्या नक्षत्रांसमोर दिसतो) या मागे जाण्याची गती दर वर्षी 50" एवढी असते. आजमितीला, वसंत संपात बिंदूच्या वेळी, सूर्य उत्तर भाद्रपदा या नक्षत्रा समोर दिसतो आहे तर 7000 वर्षांपूर्वी तो पुनर्वसू किंवा आर्द्रा नक्षत्रासमोर दिसत होता. या विलक्षण दृष्य परिणामाला, संपात बिंदूंचे परांचन (Precession of the Equinoxes) असे नाव आहे.
अगदी वराहमिहिर (इ.स.505-585) या भारतीय गणितज्ञाच्या कालापर्यंत, भारतीय तत्ववेत्ते व गणिती, संपात बिंदूंच्या परांचनाबद्दल अनभिज्ञच होते(पुस्तक संदर्भ 2). स्वत: वराहमिहिरानेच त्याच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथात आश्चर्य व्यक्त केले आहे की सूर्य रेवती नक्षत्रासमोर असताना वसंत-संपात, व सूर्य पुनर्वसु नक्षत्रासमोर असताना Summer Solstice (21 June) होत असल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना (अर्थातच वराहमिहिराच्या कालात), जुन्या ग्रंथात हा Summer Solstice (21 June) , सूर्य आश्लेशा नक्षत्रासमोर असताना होतो असे कसे काय म्हटले आहे?
लोकमान्य टिळकांचे संशोधन
जुन्या आर्य ग्रंथाचे वाचन करत असताना लोकमान्यांच्या हे लक्षात आले की आर्यांचे यज्ञयाग विधी व देवांना हविर्भाग देण्याचे विधी हे अतिशय काटेकोरपणे त्यांच्या पंचांगाप्रमाणे चालत असत. आर्यांनी वर्षाचे दोन भाग केले होते. पहिला भाग वसंत-संपात दिनापासून चालू होऊन शरद संपात दिनाला( ज्याला विशुवन असे नाव होते.) संपत असे. या कालात सूर्य विषुव वृत्ताच्या उत्तरेला असतो. या कालाला देवायन असे नाव आर्यांनी ठेवले होते. वर्षाचा दुसरा भाग, जेंव्हा सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला असतो, हा पितरायन म्हणून ओळखला जात असे. आर्यांचे यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी फक्त देवायन कालात होत असत. व हे सर्व विधी वसंत-संपात दिनापासून सुरू होत.
पुढच्या कालात,(केंव्हापासून ते माहिती नाही.) नववर्षाचा प्रथम दिन, वसंत-संपात दिवसापासून हलवून काहीतरी अज्ञात कारणास्तव, Winter Solstice (22 December) या दिवशी मानला जाऊ लागला. त्यामुळे वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन नवीन भाग पडले. असे जरी असले तरी यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी, जुन्या पंचांगाप्रमाणेच(वसंत- संपात दिनापासून) चालू राहिले.
लोकमान्यांनी आपल्या अभ्यासासाठी तीन ग्रंथ निवडले. ऋग्वेद, तैत्तरिय संहिता व वेदांग ज्योतिष हे ते ग्रंथ होते.
या तिन्ही ग्रंथात, देवांना हविर्भाग देण्याचे विधी, सूर्य कोणत्या नक्षत्रसमोर असताना आरंभ करावयाचे हे सांगितलेले आहे. म्हणजेच वसंत-संपात दिन (21मार्च) हा या तीन्ही ग्रंथांप्रमाणे, सूर्य निरनिराळ्या नक्षत्रांसमोर येत असताना येत होता.
याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. हे ग्रंथ पूर्णपणे निरनिराळ्या कालखंडात रचले गेले असल्याने, वसंत-संपात बिंदूंच्या परांचनामुळे सूर्य निरनिराळ्या नक्षत्रसमुहासमोर असल्याचे निरिक्षण त्या त्या ग्रंथकारांनी केलेले होते व ते त्यांनी ग्रंथात नमूद केले होते. ज्योतिर्विद्येच्या सहाय्याने लोकमान्यांनी या तिन्ही ग्रंथांचा काल निश्चित केला.
ऋग्वेद - इ.स.पूर्व 4000
(वसंत संपात दिन, सूर्य मृगशीर्ष किंवा अग्रहायन नक्षत्रासमोर असताना.)
तैत्तरिय संहिता - इ.स.पूर्व 2350
( वसंत संपात दिन, सूर्य कृत्तिका नक्षत्रासमोर असताना.)
वेदांग ज्योतिष - इ.स. पूर्व 1269-1181( वसंत संपात दिन, सूर्य भरणी नक्षत्रासमोर असताना.)
हे अंदाजे कालखंड त्या त्या ग्रंथांच्या सर्वात जुन्या ऋचा जेंव्हा रचल्या गेल्या तेंव्हाचे असावेत. पुढची अनेक शतके या ग्रंथांना पुढच्या पिढीतील कवींचा हातभार लागत गेला.
वृक्षकपि व इंद्र
या लेखाच्या सुरवातीला (लेखमाला भाग 5) मी एका समजण्यास अतिशय कठिण असलेल्या अशा ऋचेचा उल्लेख केला होता(10.86). लोकमान्यांनी या ऋचेचा अर्थ अत्यंत सुलभपणे विशद केला आहे. या ऋचेचा गोषवारा असा आहे.
(वृक्षकपि हे शरदकालीन सूर्याचे नाव आहे व तो इंद्राचा जिवलग मित्र आहे.)
"इंद्राचे घर उत्तरेला असताना हा वृक्षकपि खाली (दक्षिणेला) नाहीसा झाला आहे व त्याने मृगाचे रूप धारण केले आहे. सूर्य दक्षिणेला गेल्याने आर्यांनी इंद्राला हविर्भाग देणे व सोमरस गाळणे बंद केले आहे. त्यामुळे इंद्राणी संतप्त होऊन तिने मृग बनलेल्या वृक्षकपिचे डोके उडवून, कुत्र्याने त्याचे कान खावे म्हणून त्याला सोडले आहे. इंद्र आपल्या मित्राला इंद्राणीने अशी वागणूक देऊ नये म्हणून विनवतो व तिची स्तुती करतो. इंद्राणी ते मान्य करते. इंद्र व इंद्राणी, सूर्याची त्याने परत उत्तरेला यावे म्हणून विनवणी करतात."
या ऋचेत काही अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
1.सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला गेल्याने आर्यांचे बंद झालेले हविर्भाग.
2.शरद काली रात्री आकाशात मृग नक्षत्र दिसते आहे. म्हणजेच त्याच्या सहा महिने, आधी वसंत संपाताच्यावेळी, सूर्य मृगनक्षत्रासमोर आहे.
3. व्याध तार्याला व्याध न म्हणता इंद्राणी कुत्रा म्हणते आहे. या नक्षत्राचे युरोपियन नाव कुत्रा हेच ( Canine Major) आहे.
4. सूर्य परत विषुव वृत्ताच्या उत्तरेला आल्यावर, आर्यांचे सुरू होणारे हविर्भाग.
लोकमान्य टिळकांनी संशोधित केलेला हा ऋग्वेदकाल, आपल्या कालदर्शक रेषेत कसा काय बसवता येतो हे पुढच्या भागात बघूया.
संदर्भ
1. आकाश दर्शन ऍटलास - लेखक. प्रा. गो.रा परांजपे
2. Orion by Lokamanya Bal Gangadhar Tilak

Comments
गोंधळ
वसंत आणि शरद संपातांवर आणि उत्तर-दक्षिणायनांवर प्रकाश टाकणारा लेख नेहमीप्रमाणेच आवडलेला असला तरी माझा थोडा गोंधळ उडालेला आहे. तो कोणी निस्तरून देईल तर बरे होईल.
चंद्रशेखर, तुम्ही यांना ग्रंथ म्हटल्याने थोडा गोंधळ उडतो आहे. ग्रंथ म्हणजे लिखित दस्त ऐवज असा माझा ग्रह आहे. (चू. भू. दे. घे.) ऋग्वेद, तैत्तरिय संहिता वगैरे इ.स.पूर्व १००० वर्षांतही ग्रंथ स्वरुपात असणे शक्य नाही कारण त्या ऋचांना,श्लोकांना, काव्याला, सूक्तांना बंदिस्त करेल अशी लिपी अस्तित्वात नसावी.
ऋग्वेद इ.स.पूर्व ४००० मध्ये निर्माण केला गेला असल्यास आणि रामायण त्या आधी घडले असे म्हटले गेल्यास राम हा तथाकथित आर्य नाही असे मानता यावे का?
वृक्षकपिला सूर्य मानणे आणि त्याचा संबंध ओरायनशी लावणे थोडे बादरायण वाटले. इतर कोणी त्यावर आपले मत प्रकट केले तर वाचायला आवडेल. व्याध तार्याला इंद्राणी कुत्रा म्हणत असली तरी व्याध हा कुत्रा नाही. तो मोठा कुत्र्याचा आकार दाखवणार्या तार्यांतील (किंवा ग्रहांतील) सिरिअस हा एक तारा आहे. तसेच ओरायन हा ग्रीक पुराणांतील राक्षसी शिकारी आहे आणि त्याचे दोन शिकारी कुत्रे आहेत. इंद्र-इंद्राणीला ग्रीक पुराणकथा माहित होत्या असा अर्थ घ्यावा लागेल.
अवांतरः
कॉन्स्टलेशन्सही नक्षत्रे मानावीत का? म्हणजे ती नक्षत्रेसदृश गणली जातात म्हणून मला नक्षत्रे ही भारतीय ज्योतिषातील कल्पनाही परकीय वाटत होती. (केवळ नक्षत्रे या शब्दावर शोधाशोध केली असता ती भारतीय कल्पना असावी काय असा ग्रह होतो.) ८८ परकीय कॉन्स्टेलेशन्स आणि २७ देशी नक्षत्रे यांचा ताळमेळ कसा लागतो?
आणि थोडा गोंधळ
(लेख मलाही नीटसा समजलेला नाही आहे, पण मीच जास्त विचार न केल्यामुळे तसे असेल.)
अवांतराचे उत्तरः प्रियाली, ८८ कॉन्स्टीलेशन्स ही (माझ्या माहितीत) आधुनिक संकल्पना आहे, त्यांना मराठीत तारकासमूह असं नाव दिलेलं आहे. संपूर्ण आकाशाचे ८८ असमान भाग केलेले आहेत, ते हे तारकासमूह. चंद्राच्या भासमान भ्रमणकक्षेतल्या तारकासमूहांना आपण नक्षत्रं म्हणतो. भारतात चांद्र कालगणना असल्यामुळे नक्षत्र ही संपूर्ण भारतीय कल्पना असून त्यासाठी समांतर इंग्लिश शब्द नाही. झोडीऍक म्हणजे राशी, आणि या राशी सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गावर आहेत. चंद्राचा भासमान भ्रमण मार्ग आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग यांचा एकमेकांशी फक्त ५ अंशाचा कोन असल्यामुळे राशी आणि नक्षत्रांच्या पट्ट्यामधे फारसा फरक नाही. सव्वादोन नक्षत्रांची एक रास होते.
पृथ्वीच्या परांचनामुळे ४००० वर्षांपूर्वी सूर्याचा भासमान मार्ग आताच्या भासमान मार्गापेक्षा वेगळा असेल का हे अजून मला नीटसं समजलेलं नाही आहे.
भासमान मार्ग तोच, पण वसंत संपात वेगळ्या वेळी
परांचनामुळे एक्विनॉक्स (त्याच मार्गातील) वेगवेगळ्या नक्षत्रांत क्रमाने भ्रमण करते. किंबहुना वसंत संपाताचे नक्षत्र बदलते म्हणूनच परांचन होत असल्याचे अनुमान आपण करतो.
अर्थात हे तुम्हाला माहितीच आहे. फक्त "४००० वर्षांत काय फरक झाला" याचे स्पष्टीकरण म्हणून हा उपप्रतिसाद - भासमान मार्ग तोच, पण वसंत संपात वेगळ्या वेळी.
नक्षत्रासाठी इंग्रजीत प्रतिशब्द आहे - "लूनर मॅन्शन" किंवा "लूनर स्टेशन" असे प्रतिशब्द वापरतात.
प्रचलित आहे का?
हा विंग्रजी व्यवहारात प्रचलित आहे का? आमच विंग्रजी वाचन जवळपास शुन्य असल्यानी विचारत आहे. कॉन्स्टिलेशन हा शब्द तारका समुहाला वापरतात त्यावेळी तो नक्षत्राला वापरावा का? असा प्रश्न मनात यायचा पण सुर्याच्या भासमान मार्गात वाटेत येणारे तारका समुह व ८८ ष्ट्यांडर्ड तारकासमुह ज्यात काही वाटेबाहेर ही आहेत मग यांना नक्षत्र का म्हणायचे?
परांचनामुळे निरयन गणितातील नक्षत्राबाबत लिहिलेले वर्णन हे हळु हळु (वास्तविक)गैरलागु होउ लागले मग सायन गणितात नक्षत्र संकल्पेना बसवण्यासाठी सायनाचार्य 'विभागात्मक नक्षत्रे' असा शब्द प्रयोग करु लागले.
प्रा. र.वि. वैद्य (ज्यांनी भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या शं.बा दिक्षित लिखित पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले असे ते) यांची वैदिक संस्कृति : सुबोध परिचय: ग्रंथमाला या मालिकेत पंचांग म्हणजे काय संक्षेपात पंचांग वाद या पुस्तकात मौलिक माहिती आहे. तसेच आमची नक्षत्रे हेही मालिकेतील पुस्तक सुंदर आहे. पुणे विद्यार्थी गृहाने ती १९६५ साली प्रकाशित केली आहेत.
माझ्या ई ग्रंथालयात हे समाविष्ट करण्याचा विचार चालु आहे म्हणजे ते उपक्रमींना वाचता येईल.
प्रकाश घाटपांडे
अल्पप्रचलित
आधुनिक खगोलाला याचे फारसे पडलेले नाही, म्हणून शाळेत हा शब्द शिकवत नसावेत. ("चंद्र सूर्याच्या/अन्य तर्याच्या सापेक्षने अमुक इतक्या वेळाने/कोनात उगवेल" असे म्हणता येते, मग "चंद्र अमुक नक्षत्रात आहे" म्हणायची गरज कमी-कमी होत जाते.)
पण पाश्चात्त्य फलज्योतिषवाल्यांना वगैरे कधीकधी माहीत असावा असे वाटते.
मी स्वतः हे प्रतिशब्द मॅक्सम्युलरच्या एका पुस्तकात हल्लीच वाचले आहेत.
लूनर मॅन्शन
हा शब्द मला विकास यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रतिसादात दिलेल्या बॉम्बे गॅझेटियरच्या संदर्भातही मिळाला. त्यावरून आहे असे म्हणण्यास जागा आहे.
ग्रंथ
१.ग्रंथ हा शब्द मी जेनेरिक अर्थाने वापरला आहे. त्याचा अर्थ एक निर्मित केलेले गद्य वा पद्य स्वरूपातील वाङमय एवढाच घेणे.
२.या लेखाच्या (ऋग्वेदकाल) शेवटच्या भागात कोण आर्य होते व कोण नाही याबाबत मी थोडी चर्चा जरूर करणार आहे. राम आर्य होता की नाही ते स्पष्ट होईलच. कृपया थोडी प्रतिक्षा करा.
३. ऋग्वेदाची कोणतीही ऋचा तुम्ही बघितलीत तरी एखादी गोष्ट सरळ सरळ सांगितली आहे असे क्वचितच घडते. कदाचित एकमेकांना कोड्यात टाकणे तत्कालीन ज्ञानीपंडितांना आवडत असावे. ती ऋग्वेदाची स्टाईलच आहे. त्यामुळे वृक्षकपीची कथा बादरायणी वाटली तरी अनकॉमन नक्कीच नाही.
४. जुन्या भारतीय ग्रंथांमधे, नक्षत्रे याचा अर्थ आयनिक वृत्तावर (सूर्याचा आकाशातील मार्ग) असलेले तारकासमूह एवढाच घ्यायचा असतो. म्हणून ती नक्षत्रे २७च आहेत. इंग्रजीत याला झोडियाक असे नाव आहे.कॉन्स्टेलेशन्स ही आकाशभर पसरलेली असतात.
५. इंद्राणी फक्त एका तार्याबद्दल बोलत नसून कॅनिन मेजर या नक्षत्राबद्दलच बोलते आहे. व्याध हा तारा बहुतेकांना माहिती असल्याने मी फक्त त्याचा उल्लेख केला आहे कारण नुसत्या डोळ्याने मुख्यत्वे व्याधच(सिरियस) दिसतो. कुत्र्याचा उल्लेख मी मुद्दाम केला आहे त्याचा उलगडा पुढील भागात होईल
चन्द्रशेखर
ऋग्वेदाचा काळ
ऋग्वेदाचा रचनाकाळ
लो.टिळक यांनी दिलेला काळ (इ.स.पूर्व ४०००) हा ऋग्वेदाच्या त्या भागापुरता योग्य मानला पाहिजे. ऋग्वेदाचा रचनाकाळ हा अनेक शतकांचाच नाही तर अनेक सहस्रकांचा असल्याने हे नमुद करणे आवष्यक आहे. तसेच हा भाग ऋग्वेदाचा सर्वात प्राचीन भाग आहे हे प्रतिपादन बरोबर वाटत नाही. जा भागात उत्तर धृव भागातील सृष्टीवर्णन आहे तो भाग (बहुधा) सर्वात प्राचीन असावा.
शरद
ऋग्वेदाचा रचनाकाळ
ओरायन या ग्रंथात लोकमान्य पान २२० वर काय म्हणतात ते पाहू.
"आर्य संस्कृतीतला सर्वात पुरातन काल अदिती काल या नावाने ओळखता येईल.या कालाची कालमर्यादा इ.स.पूर्व ६००० ते ४००० असावी.या कालात संपूर्णपणे रचलेल्या ॠचा ज्ञात नाहीत. अर्धवट गद्य आणि अर्धवट पद्य स्वरूपाचे हविर्भाग देण्यासाठीचे फॉर्म्युले रचले गेले होते असे दिसते. यात ज्या देवांना हविर्भाग द्या्यचा त्यांची नावे आणि पराक्रम गोवलेले होते."
संपूर्ण पद्यरूपी ऋचा इ.स.पूर्व ४००० या नंतरच रचलेल्या आढळतात
चन्द्रशेखर